एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। एरंडोलजवळ उमरदे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून सुमारे २ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या पाण्याच्या मोटारींची चोरी झाली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील चिपडा येथील एका कंपनीतून पाण्याचे सबमर्सिबल रोलपंप मोटर आणि सोलर पंप मोटर घेऊन जी.जे. ०३ बी.झेड. ७४६५ क्रमांकाचा ट्रक जालना येथे जात होता. चालक लाखाभाई रताभाई बोरिचा आणि क्लिनर केशव भाई पटेल हे एरंडोलजवळ उमरदे गावापुढे असताना ट्रकमध्ये बिघाड झाला. त्यांनी ट्रक रस्त्याच्या कडेला लावून ते झोपी गेले.
याच दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ट्रकमधून ९० हजार रुपये किमतीच्या २८ सबमर्सिबल रोलपंप मोटर आणि १ लाख ४५ हजार रुपयांच्या २९ सोलर पंप मोटर असा एकूण २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला. ट्रक चालक लाखाभाई रताभाई बोरिचा यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवींद्र तायडे आणि हे.कॉ. काशिनाथ पाटील करत आहेत.