चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे मध्यरात्री चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून धाडसी घरफोडी केली आहे. या घटनेत अंदाजे दोन लाख रुपयांची रोकड आणि दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. विशेष म्हणजे, चोरीसाठी आलेल्या दोन दुचाकीवरील चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एका बंद घराला लक्ष्य करत धाडसी घरफोडी केली. सुभाष मोतीराम चकोर हे आपल्या कुटुंबासह मुंबईला गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील अंदाजे दोन लाख रुपयांची रोकड तसेच दोन तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. ही चोरीची घटना गावातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, त्यात दोन दुचाकींवरून चार चोरटे आल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे पोलिसांना तपास करणे सोपे होणार आहे.
चोरी झाल्याची माहिती मिळताच, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांसह श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. श्वान पथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. या धाडसी घरफोडीमुळे हातगाव परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने, नागरिकांनी बाहेरगावी जाताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.