पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोऱ्यासारख्या छोट्या शहरातून शिक्षण घेऊन, जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर डॉ. अपूर्वा श्याम ढवळे यांनी औषध निर्माण शास्त्रात डॉक्टरेटची पदवी मिळवून आपल्या कुटुंबासह संपूर्ण शहराचे नाव उज्वल केले आहे. त्यांनी के. एल. ई. अकॅडमी ऑफ हाईअर एज्युकेशन अँड रिसर्च, बेंगळुरू (कर्नाटका) या नामांकित विद्यापीठामधून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू परिधीय न्यूरोपॅथी हा वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय राहिला.
परिधीय न्यूरोपॅथी ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये मेंदू आणि पाठीच्या कण्याबाहेरच्या नसांवर परिणाम होतो. परिणामी, रुग्णांना हात-पाय सुन्न होणे, मुंग्या येणे, तीव्र वेदना जाणवणे आणि स्नायूंचे कमजोर होणे अशी लक्षणे भोगावी लागतात. या विषयातील तपशीलवार अभ्यास करून डॉ. अपूर्वा यांनी फिजिओलॉजिकल आणि फार्मास्युटिकल दृष्टिकोनातून नवे दृष्टिकोन उभारले आहेत. त्यांच्या या संशोधनास शास्त्रीय क्षेत्रात मान्यता मिळाल्याने त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. अपूर्वा यांचे या यशामागे कुटुंबियांचे आणि विशेषतः पती राहुल साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राहुल साळुंखे हे स्वतः एम. टेक पदवीधर असून त्यांनी आय. आय. टी. रुरकी येथून शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स या आंतरराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. अपूर्वा यांना त्यांच्या या प्रगल्भ, तांत्रिकदृष्ट्या समृद्ध अशा जीवनसाथीचे मार्गदर्शन या प्रवासात महत्त्वाचे ठरले. डॉ. अपूर्वा या पाचोरा नगरपरिषदेचे कर्मचारी श्याम ढवळे आणि ज्योती ढवळे यांची कन्या आहेत. त्यांच्यासह सासू-सासरे, पती आणि त्यांच्या मुली रेवा यांचेही उत्तम सहकार्य त्यांना लाभले. शैक्षणिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत, त्यांनी ही डॉक्टरेटची वाट यशस्वीपणे पार केली.
मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या अपूर्वा यांनी आपल्या मेहनतीने सिद्ध केले की, ठाम निश्चय असेल तर कोणतेही शिखर दूर राहत नाही. त्यांच्या या यशाचे पाचोऱ्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात अपूर्वा यांनी दिलेल्या या योगदानामुळे ग्रामीण विद्यार्थिनींसाठी त्या प्रेरणास्थान ठरल्या आहेत.या यशाबद्दल समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, ‘डॉ. अपूर्वा श्याम ढवळे’ हे नाव आता शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचले आहे.