जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा येथे ८ जून रोजी विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय नीता दिलीप सोनवणे (रा. कानळदा) या मुलीचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ८ जून रोजी घडली असून, १३ जून रोजी रात्री उशिरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कानळदा येथे मजुरी करून उदरनिर्वाह करणारे दिलीप सोनवणे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी नीता ही ८ जून रोजी शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर तिने तिथेच काहीतरी विषारी औषध प्राशन केले. घरी परतल्यानंतर तिला उलट्या सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तिला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात नीतावर उपचार सुरू होते, मात्र उपचारांना प्रतिसाद न देता तिचा १३ जून रोजी रात्री मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत करत आहेत. या घटनेमुळे कानळदा गावात हळहळ व्यक्त होत आहे.