भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नार्थ कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका तरूणाचे भर दिवसा बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण १ लाख ८७ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी १० जून रोजी समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन चंद्रमणी शिंदे वय २५ रा. नार्थ कॉलनी, भुसावळ हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. मंगळवारी १० जून रोजी दुपारी १२ ते दीड वाजेच्या सुमारास त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण १ लाख ८७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर चेतन शिंदे यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून चोरी झाल्याची तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल भंडारे हे करीत आहे.