यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथे वनविभागाच्या वतीने आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “ऑपरेशन सिन्दुर” या राष्ट्रीय रक्तदान अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक रक्तसाठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन यावल प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयात करण्यात आले. उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या उपक्रमात वनकर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यावलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात हा रक्तदान उपक्रम ठळक ठरला.
कार्यक्रमाच्या दरम्यान डांभुर्णी (ता. यावल) येथील नरभक्षक बिबट्याला जेरबंद करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वनप्राण्याला पकडण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी सतत अथक प्रयत्न केले होते, ज्याची दखल वनविभागाने घेत या कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार केला.
सदर कार्यक्रमात पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक पाऊल टाकत विविध जातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण देखील करण्यात आले. या उपक्रमात वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. “ऑपरेशन सिन्दुर” रक्तदान मोहिमेत एकूण ३५ जणांनी रक्तदान केले. यामुळे राष्ट्रीय आपत्ती परिस्थितीत गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पूर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फंटागरे, यावल पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र कर्मचारी तसेच सर्व वनकर्मचाऱ्यांनी अत्यंत मेहनत घेतली