धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि धरणगाव नगरपरिषदेच्या समन्वयातून आयोजित करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिरा’ला धरणगाव शहरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या शिबिराचा शुभारंभ ९ जून रोजी झाला असून, पहिल्याच दिवशी ७३८ नागरिकांनी या आरोग्यसेवेचा लाभ घेतला.
धरणगावकरांना उत्तम आणि मोफत आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने ९ जून ते १४ जून या कालावधीत सहा दिवसांच्या या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील पाटील मढी, बजरंग चौक, मोठा माळीवाडा पंच भवन, लहान माळीवाडा पंच भवन, शिवकृपा एक्वा नवेगाव आणि ग्रामीण रुग्णालय अशा सहा वेगवेगळ्या ठिकाणी हे शिबिर सुरू आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य माननीय प्रतापराव दादा पाटील, अभिजीत भाऊ पाटील, संजय भाऊ महाजन, कैलास माळी सर, पप्पू भावे, विलास महाजन, दिलीप महाजन यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टर्स तसेच नेत्ररोग तज्ञ रुग्णांची तपासणी करत आहेत. यासोबतच रुग्णांची मोफत रक्त तपासणी आणि ईसीजी काढण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी ७३८ रुग्णांची तपासणी झाली, ज्यामध्ये १२२ रुग्णांची रक्त तपासणी आणि ५२ रुग्णांचे ईसीजी करण्यात आले. तपासणीअंती अधिक उपचारांची गरज असलेल्या १०६ रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले आहे. या संदर्भित रुग्णांना शासकीय योजनेअंतर्गत आवश्यक शस्त्रक्रिया आणि पुढील सर्व उपचार पूर्णपणे मोफत मिळणार आहेत.
या आरोग्यसेवेच्या महायज्ञात संवेदना हॉस्पिटल (जळगाव), भोले विघ्नहर्ता हॉस्पिटल (पारोळा), श्री नृसिंह हॉस्पिटल (चोपडा), कल्पना हॉस्पिटल (एरंडोल), कांताई नेत्रालय (जळगाव) आणि ग्रामीण रुग्णालय (धरणगाव) यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शहरातील डॉ. शैलेश सूर्यवंशी, डॉ. मनोज अमृतकर, डॉ. चेतन भावसार, डॉ. पंकजा अमृतकर, डॉ. निधी अमृतकर, डॉ. विद्या मराठे, डॉ. जैन आणि नितेश माळी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.