यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व कृषिमित्र स्व. हरिभाऊ माधव जावळे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी ना नफा, ना तोटा या तत्वावर ताडपत्री वाटपाचा कार्यक्रम येत्या १६ जून रोजी आयोजित करण्यात आला असून, याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
स्व. हरिभाऊ जावळे यांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली अर्पण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, यावलचे सभापती राकेश फेगडे व संचालक मंडळाने योजनेची आखणी केली आहे. ताडपत्री वितरणाचा शुभारंभ रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते होणार आहे.
ताडपत्रीचे स्पेसिफिकेशन हे देखील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ठरवले गेले आहे. यामध्ये २० बाय ३० फुट आकाराची, २५० जीएसएम वजनाची, काळ्या रंगाची HDPE मटेरियलची ताडपत्री दिली जाणार आहे. या ताडपत्रीची बाजारात MRP ₹५१०० असताना, योजना किंमत फक्त ₹१८०० इतकी ठरवण्यात आली आहे, ही बाब शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.
या योजनेसाठी काही अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. ताडपत्रीचे प्रमाण मर्यादित असल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ हा तत्त्व लागू राहील. ही योजना केवळ शेतकरी बांधवांसाठीच असून, अर्ज करताना ७/१२ उतारा, आधार कार्ड यांसह शेतकऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे. प्रतिनिधीमार्फत (परहस्ते) वितरण केले जाणार नाही. लाभ घेण्यासाठी KYC अनिवार्य असून, फक्त रोखीनेच रक्कम स्वीकारली जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी दिनांक १६ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, यावल येथे उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती राकेश फेगडे आणि संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. हा उपक्रम एकप्रकारे शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवली जाणारी कृतज्ञतेची भावना आहे, असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.