जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गायत्री नगर येथील ज्योती संदीप मेकलकर (वय-४५) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ९ हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने, चांदीचे पूजेचे साहित्य आणि लॅपटॉप असा एकूण ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. ३१ मे ते ६ जून दरम्यान, मेकलकर कुटुंबीय नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यासाठी बाहेरगावी गेले असताना ही चोरी झाली. या प्रकरणी रविवारी, ७ जून रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय घडले?
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री नगरातील रहिवासी ज्योती मेकलकर कुटुंबीयांसह नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडला. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी लोखंडी कपाटातून रोख नऊ हजार रुपये आणि सहा हजार रुपये किमतीची सोन्याची बाळी व नथ लंपास केली. याव्यतिरिक्त, १० हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजन, चांदीचे नाणे, कुंकवाचे दोन करंडे आणि १२ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा एकूण ३७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
कुटुंब घरी परतल्यानंतर उघडकीस आली घटना
मेकलकर कुटुंबीय ६ जून रोजी रात्री घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसला आणि घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी ज्योती मेकलकर यांनी रविवारी, ७ जून रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर करत आहेत. नागरिकांनी घराला कुलूप लावून बाहेर जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.