सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रवाशांच्या सेवेसाठी सजग असलेले सावदा येथील प्रतिष्ठित व्यापारी आणि समाजसेवक शब्बीर हुसेन हाजी अख्तर हुसेन उर्फ बाबुशेठ यांच्या परिवारातर्फे सावदा बस स्थानकावर थंड पाण्याच्या वॉटर कुलरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा उपक्रम त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राबवण्यात आला.
या लोकोपयोगी उपक्रमाचे उद्घाटन चार्टर्ड अकाउंटंट जाफर शब्बीर हुसेन यांच्या हस्ते रविवारी पार पडले. वॉटर कुलरची ही सुविधा कै. हाजी अख्तर हुसेन इमदाद अली यांच्या स्मृतीला वाहिलेली एक सामाजिक सलामी आहे. या प्रसंगी रावेर आगाराचे सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, एसटीचे चालक-वाहक आणि स्थानिक प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी होत बाबुशेठ आणि त्यांच्या परिवाराच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
या उपक्रमामुळे उष्णतेच्या दिवसांत प्रवाशांना थंड पाण्याचा दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक ठिकाणी अशी सुविधा देणं ही बाबुशेठ यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करते. व्यापारी असूनही सामाजिक भान जपत त्यांनी जनहिताची दिशा दाखवली आहे. या कृतीतून समाजातील इतर घटकांनाही प्रेरणा मिळेल, असा सूर उपस्थित मान्यवरांच्या भाषणांतून उमटला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे कुठलाही गाजावाजा न करता साधेपणाने पार पडलेला लोकार्पण सोहळा. फक्त समाजाच्या हितासाठी काहीतरी दिलं पाहिजे, ही बाबुशेठ यांची धारणा या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून आली. स्थानिक नागरिकांनी या कुटुंबाच्या सामाजिक जाणिवेचे विशेष कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम सुरू राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.