जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉपजवळ रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात कंटेनरने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना आज, रविवारी (१ जून) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या भीषण अपघातात विशाल रमेश सोनार (वय अंदाजे, रा. शिव कॉलनी, जळगाव) असे मयत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक वाहन घेऊन तात्काळ फरार झाला.
या घटनेची माहिती मिळताच शिवकॉलनी येथील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे स्वरूप इतके भीषण होते की, विशाल सोनार यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस कर्मचारी देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, विशाल सोनार हे पाळधीकडून जळगाव शहराकडे जाणाऱ्या रोडवर शिवकॉलनीजवळ रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी वेगाने आलेल्या एका अज्ञात कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली आणि त्यांना चिरडले. हा अपघात दुपारी अडीच वाजता घडल्यानंतर, कंटेनर चालक न थांबता घटनास्थळावरून पसार झाला.
मयत विशाल सोनार यांच्या खिशात त्यांचे ओळखपत्र आढळून आले. त्यावरून ते महसूल विभागात शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. या माहितीने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी तात्काळ मृतदेहाचा पंचनामा केला आणि एका खाजगी वाहनातून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत विशाल सोनार यांच्या नातेवाईकांनी देखील रुग्णालयात धाव घेतली असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीसांकडूनफरार कंटेनरचालकाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.