अडावद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अडावद येथील शामराव येसो महाजन विद्यालयात आज, १२ जून रोजी ‘जागतिक बाल मजुरी विरोधी दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. “बालकांना त्यांच्या शिक्षणावर लक्ष देण्याची आवश्यकता असताना त्यांना कामावर पाठवणे हा गुन्हा आहे,” असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांनी केले.
बालमजुरीचे दुष्परिणाम आणि ज्ञानाचे महत्त्व
श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था, अडावद संचलित शामराव येसो महाजन विद्यालयात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल ॲफ्रो बीसीसीआय संस्थेचे कृषी मित्र समाधान धनगर आणि कैलास गवळी उपस्थित होते. समाधान धनगर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मुलांना प्रेम आणि काळजीची गरज असते, बालमजुरी ही न्याय्य गोष्ट नाही. मुलाला पैसे नाही तर ज्ञान मिळवू द्या. बालमजुरीवर बंदी घालावी, बालपण म्हणजे शिकणे, कमाई नाही.”
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
यावेळी विठ्ठल ॲफ्रो संस्थेतर्फे उपस्थित विद्यार्थ्यांना चित्रकला वही आणि पेन्सिल असे शालेय उपयोगी साहित्य वितरीत करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अधिक आवड निर्माण होईल.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला उपशिक्षक एम.एन. माळी, पी.आर. माळी, एस.बी. चव्हाण, एस.के. महाजन, पी.एस. पवार, व्हि.एम. महाजन, सी.एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, कैलास महाजन, अशोक महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पी.आर. माळी यांनी केले.