पुणे लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी कुंडमळा पर्यटन स्थळावर झालेल्या अपघातातील जखमींची तळेगाव येथील जनरल हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या ३७ जणांवर उपचार सुरू असून, दोघांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. अपघातात वाहून गेलेल्या सर्वांना वाचवण्यात यश आले असून, अद्याप कोणाही व्यक्ती हरवल्याची तक्रार प्राप्त झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाने या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तसेच जखमींचा शासकीय किंवा खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.
पर्यटकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन
मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ज्या पुलावर हा अपघात घडला, त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास प्रशासनाने मनाई केली होती. तरीही पर्यटक त्या ठिकाणी गेल्याने ही दुर्घटना घडली. “पर्यटकांवर आम्ही थेट कारवाई करू शकत नाही, मात्र त्यांनी पर्यटनस्थळी जाताना नियमांचे पालन करायला हवे,” असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. जिल्हा प्रशासनाने दोन्ही बाजूने सूचना फलक लावले होते आणि पोलीस प्रशासनाने वर्तमानपत्रांमध्येही या पुलावर कोणीही जाऊ नये अशी अधिसूचना दिली होती. मात्र पर्यटक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, असेही त्यांनी नमूद केले.
नवीन पुलासाठी ८ कोटींचा निधी मंजूर
स्थानिकांनी नवीन पुलाच्या बांधकामाची मागणी केली असता, गेल्या सहा महिन्यांपूर्वीच या पुलाच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पात आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. याचे टेंडरही पूर्ण झाले होते, मात्र केवळ वर्क ऑर्डर बाकी असल्याने काम सुरू होण्यास उशीर झाला. पावसाअभावी या पुलाचे बांधकाम करता आले नाही, परंतु येत्या वर्षभरात या पुलाचे बांधकाम निश्चित पूर्ण होईल, असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. हा पूल खरं तर दोन गावांना जोडण्यासाठी पादचारी मार्ग म्हणून तयार करण्यात आला होता, मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.