बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुलढाणा येथील महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कॅम्पस ड्राईव्हमध्ये २४२ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्या कल्पक नेतृत्वाखाली, अमरावती विभागाचे सहसंचालक प्रा. मनोज अंधारे यांच्या मार्गदर्शनात आणि प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे हे यश संपादन झाले आहे. संस्थेचे आस्थापना व प्रशिक्षण अधिकारी प्रा. रविंद्र प्रांजळे आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने कॅम्पस ड्राईव्ह प्रक्रिया राबवण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
डिप्लोमा ठरला रोजगाराचे उत्तम माध्यम
ज्या होतकरू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, त्यांच्यासाठी दहावी नंतरचा डिप्लोमा हा रोजगाराचे एक उत्कृष्ट माध्यम असल्याचे या कॅम्पस ड्राईव्हमधून सिद्ध झाले आहे. मिळालेल्या रोजगाराचे विश्लेषण केल्यास, बजाज ऑटो, टाटा पॉवर, टाटा मोटर्स, जॉन डीअर, धूत ट्रान्समिशन, इंस्टोर इंडिया प्रा. लि., फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, सिग्मा इलेक्ट्रिकल, डायकिन्स प्रा. लि., लुमॅक्स इंडिया प्रा. लि., एंड्रेस अँड हॉसर फ्लोटेक प्रा. लि. अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी आकर्षक पॅकेज मिळाले असून, काही विद्यार्थ्यांना कमाल 4 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे, ही एक महत्त्वाची उपलब्धी आहे.
टाटा मोटर्सचा ‘लक्ष्य प्रोग्राम’ आणि उच्च शिक्षणाची संधी
या कॅम्पस ड्राईव्हमधील सर्वात कौतुकास्पद बाब म्हणजे टाटा मोटर्स कंपनीने ‘लक्ष्य प्रोग्राम’ अंतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बी.टेक पदवी प्रायोजित करण्याची संधी दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे, जे त्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अजूनही काही कंपन्यांचे निकाल येणे बाकी असून, त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल असा विश्वास प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांनी व्यक्त केला आहे.
सामूहिक प्रयत्नांचे यश
संस्थेतील प्रशिक्षण व आस्थापना विभाग, कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी, अद्ययावत सोयीसुविधा, दर्जेदार शिक्षण, उच्चशिक्षित शिक्षक वर्ग व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होणारे प्रामाणिक प्रयत्न, तसेच शैक्षणिक विभागांमधील उत्कृष्ट समन्वय यामुळे ही यशस्वी भरती प्रक्रिया पार पडली. यासाठी विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांनी आनंद व्यक्त केला असून, संस्थेची उज्ज्वल परंपरा यावर्षीही कायम ठेवल्याबद्दल सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. संस्थेचे जनसंपर्क अधिकारी प्रा. राजेश मंत्री यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.