मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ पत्रकार छबिलदास पाटील लिखित ‘मायेची सावली’ या हृदयस्पर्शी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात पार पडला. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते आणि लेखकाच्या संवेदनशील लिखाणाचे विशेष कौतुक करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, माफदा प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ, छोटू भोई, नवनीत पाटील, किशोर चौधरी, तसेच संत मुक्ताई पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शरद बोदडे, सचिव संदीप जोगी, राजेश चौधरी, निलेश मेढे, अमोल वैद्य यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतात छबिलदास पाटील यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत म्हटले की, “समाजामध्ये मूल्यांची जपणूक करणारे आणि तरुण पिढीला दिशा देणारे असे साहित्य आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. ‘मायेची सावली’ हे पुस्तक केवळ साहित्यकृती नसून आई-वडिलांविषयी कृतज्ञतेचा जिवंत अनुभव आहे.”
आ. चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “या पुस्तकातून तरुण पिढीला आई-वडिलांविषयी आदर, जबाबदारी आणि संवेदना यांचे भान येईल. अशा प्रकारच्या लेखनातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते.” पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लेखकाच्या संवेदनशील लेखनशैलीची प्रशंसा करत त्यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘मायेची सावली’ हे पुस्तक आधुनिक जीवनशैलीत हरवत चाललेल्या कुटुंबमूल्यांना पुन्हा उजाळा देणारे ठरते. लेखक छबिलदास पाटील यांनी अत्यंत भावनिक व संयत शैलीत लिहिलेल्या या पुस्तकात पालक ही देवतुल्य व्यक्ती आहेत, त्यांची सेवा, सन्मान व आदर ही प्रत्येक मुलांची जबाबदारी आहे, असा ठाम संदेश दिला आहे. आजच्या पिढीला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे हे साहित्य सामाजिक दृष्टिकोन घडवणारे ठरत आहे.