जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या मेहुणबारे गावात उसाच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरात मादी बिबट्यासह एकूण तीन बछडे असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मेहुणबारे येथील कैलास महादू महाजन यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू असताना मजुरांना बिबट्याची मादी आणि तिच्यासोबत तीन बछडे दिसले. मजुरांची अचानक झालेली हालचाल जाणवल्याने बिबट्याची मादी एका बछड्याला घेऊन लगेच तेथून निघून गेली. मात्र, तिची दोन बछडे त्याच ठिकाणी राहिली.
घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने तातडीने कार्यवाही करत शेतात तीन ट्रॅप कॅमेरे (trap cameras) बसवले आहेत. मादी बिबट पुन्हा आपल्या बछड्यांना घेण्यासाठी त्या ठिकाणी येण्याची शक्यता असल्याने वनविभाग या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवून आहे.
वनविभागाकडून बिबट्याची मादी आणि तिच्या बछड्यांची पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे बिबट्याच्या बछड्यांना सुरक्षितपणे त्यांच्या मादीकडे परत पाठवता येईल, अशी आशा आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी, वनविभाग परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.