पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल आज दुपारी अचानक कोसळल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत अंदाजे २० ते २५ जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल सुरू असून बचाव कार्याला सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, कुंडमळा हे मावळ तालुक्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. ज्याठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावलात. दरम्यान या ठिकणी इंद्रायणी नदी असून या नदीवर पुल बांधण्यात आला होता. रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होती. दरम्यान रविवारी दुपारच्या सुमारास यातील काही पर्यटक हे या पुलावर उभे होते. त्यावेळी अचानक हा पुल कोसळला. यामुळे या पुलावर असलेले २० ते २५ पर्यटक नदीत वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही घटना दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. हा पुल जीर्ण झाल्यामुळेच हा पुल कोसळला असल्याचे मत स्थानिक नागरीकांनी व्यक्त केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलिस दाखल झाले आहेत. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन एनडीआरएफचे जवान देखील घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला सुरूवात करण्यात आली आहे. वाहून गेलेल्या पर्यटकांना नदीतून बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे पुणे जिल्हा हादरला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच स्थानिक जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.