जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील श्रीराम चिट्स फंड प्रा. लि. कंपनीचा व्यवस्थापक विवेक बिरे (रा. जळगाव) याला रामानंद नगर पोलिसांनी यवतमाळ येथून अटक केली आहे. पॉलिसी काढण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांवर परस्पर दुसऱ्या व्यक्तीला जामीनदार लावून फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होता. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तो फरार झाला होता. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पॉलिसीच्या कागदपत्रांचा गैरवापर
यावल येथील मेडिकल व्यावसायिक प्रशांत कासार यांनी श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या एजंटला लाईफ पॉलिसी काढण्यासाठी काही कागदपत्रे दिली होती. याच कागदपत्रांचा गैरवापर करत, विवेक बिरे आणि एजंट मुकेश पाटील यांनी प्रशांत कासार यांना परस्पर दुसऱ्या व्यक्तीला जामीनदार म्हणून लावले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशांत कासार यांनी रामानंद नगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यवस्थापक विवेक बिरेने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यानंतर बिरे फरार झाला होता. तपास अधिकारी पोहेकॉ अतुल चौधरी आणि विनोद सूर्यवंशी यांनी तांत्रिक विश्लेषण (technical analysis) करत विवेक बिरेचा शोध घेतला आणि त्याला यवतमाळ येथून अटक करून जळगावला आणले.
अनेकांची फसवणूक झाल्याचा संशय, एक दिवसाची पोलीस कोठडी
अटक केलेल्या विवेक बिरेला रविवारी जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी आणि फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, संशयित बिरेने अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी न्यायालयाने विवेक बिरेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. फिर्यादीच्या वतीने ॲड. मिलींद पाटील यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ अतुल चौधरी करत आहेत.