जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाच्या वतीने, बी.एस्सी. नर्सिंगच्या सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ‘नैसर्गिक प्रसुती म्हणजेच नॉर्मल वजायनल डिलिव्हरीवरील ॲडव्हान्स क्लिनिकल कौशल्य प्रशिक्षण’ कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये नैसर्गिक प्रसूतीबाबतची कौशल्ये वाढवणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि व्यावहारिक माहिती
या कार्यशाळेत डॉ. हंसीहा पिल्लई, निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी कर्मचाऱ्यांना नॉर्मल डिलिव्हरीची योग्य प्रक्रिया, आवश्यक कौशल्ये आणि प्रसूतीच्या विविध टप्प्यांचे सखोल ज्ञान दिले. यामध्ये बाळाला सुरक्षितपणे बाहेर काढणे, प्रसूतीनंतर माता आणि बाळाची काळजी घेणे, प्रसूतीदरम्यान उद्भवणाऱ्या समस्या ओळखणे आणि त्यावर तातडीने उपाययोजना करणे यावर भर देण्यात आला. डॉ. पिल्लई यांनी प्रसूती वेदना, गर्भाची स्थिती आणि प्रसूतीनंतरची काळजी यावर मार्गदर्शन करत, सामान्य प्रसूतीच्या प्रक्रियेतील वैद्यकीय दृष्टिकोन, धोके आणि व्यवस्थापन यावर आधारित व्यावहारिक माहिती दिली.
कार्यशाळेचे आयोजन आणि सहभाग
या कार्यक्रमाच्या प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. (उपप्राचार्य) जॅसिंथ ढाया (प्रोग्रॅम हेड) आणि प्रा. निर्भय मोहोड (विभागप्रमुख, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभाग) यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. स्वाती गाडेगोणे, प्रा. डिव्हायाना पवार, प्रा. अश्लेशा मून आणि प्रा. रितेश पडघन यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. सहाव्या सत्रातील बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनीही ही कार्यशाळा यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण सहभाग दिला. ही कार्यशाळा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात भर घालणारी आणि त्यांना प्रसूती संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करणारी ठरली.