यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुका काँग्रेस कमिटीचे २९ वर्षांपासून अध्यक्ष असलेले माजी जि.प. सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, माजी जि.प.सदस्य आर. जी. पाटील, जिल्हा बँक संचालक विनोद पाटील यांच्यासह पश्चिम भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज मंगळवारी मुंबई येथे भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य कार्यक्रम पार पडला. आमदार अमोल जावळे देखील यावेळी उपस्थित होते. या प्रवेशामुळे यावल तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असून, आगामी निवडणुकांवर याचे मोठे परिणाम होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
प्रभाकर सोनवणे यांच्या प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार
प्रभाकर आप्पा सोनवणे हे यावल तालुक्यात एक प्रभावशाली नेतृत्व मानले जातात. त्यांचा भाजप प्रवेश हा तालुक्याच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवणारा ठरू शकतो. त्यांच्यासोबत अनेक ग्रामपातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.
प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश
या प्रवेश करणाऱ्यांमध्ये जिल्हा बँकेचे संचालक विनोद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जी. पाटील, शेतकी संघाचे अमोल भिरूड, सरपंच संघटनेचे प्रमुख संदीप सोनवणे, रमजान तडवी, अनिल पाटील, पुंडलीक सावळे, आरती पाटील, मुबारक तडवी, योगेश कोळी, संदीप पाटील, मीनाक्षी पाटील, पाडळसा येथील किरण तायडे, शेखर तायडे, सीताराम कोळी सह लताताई पाटील, विनोद कोळी, प्रमोद सोनवणे, बाळू शिंपी आणि प्रवीण सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.