जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव शहरातील महाबळ परिसरातील एका भागात राहणारी १८ वर्षीय तरुणीला अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. एवढेच नाही तर, आरोपीने तिला पळवून नेऊन तिचे आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करून तिची बदनामी केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी गणेश साहेबराव पाटील याच्यासह त्याला मदत करणाऱ्या तिघा मित्रांविरोधात बुधवारी ३० जुलै रात्री उशिरा रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी संशयित आरोपी गणेश साहेबराव पाटील याने पीडित तरुणीला बोलण्यात गुंतवून तिच्यावर अत्याचार केला. त्याने या कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर तो या तरुणीला सातत्याने धमकावून तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. अखेर, गणेश पाटील याने तरुणीला पळवून नेले आणि तिचे आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करून तिची बदनामी केली. या सर्व कृत्यात आरोपी गणेशचे मित्र विजय, विकास आणि मनोज (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांनी त्याला सहकार्य केले.
या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने धाडस करत रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता गणेश साहेबराव पाटील याच्यासह विकास, विजय आणि मनोज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार करत आहेत.