जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील आलोक ॲग्रो प्रॉडक्ट्स कंपनीतून ६ हजार रुपये किमतीच्या सोयाबीन तेलाच्या कॅना चोरल्याची घटना सोमवारी (२८ जुलै) सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी बुधवारी (३० जुलै) सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. ललित लीलाधर हळवे (वय २५, रा. मेस्कोमाता नगर, जळगाव) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये आलोक महेशचंद अग्रवाल (वय ४२, रा. सुभाष चौक, जळगाव) यांची आलोक ॲग्रो प्रॉडक्ट्स नावाची कंपनी आहे. २८ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ललित लीलाधर हळवे याने कंपनीतून ६ हजार रुपये किमतीच्या सोयाबीन तेलाच्या कॅना चोरून नेल्या.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीचे मालक आलोक अग्रवाल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली आणि संशयित आरोपी ललित हळवे याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वंजारी करत आहेत.