जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यातील महसूल प्रशासनाचे कार्य अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि जनहितकारी बनवण्यासाठी आज, १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ आणि १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत ‘महसूल सप्ताह-२०२५’ साजरा करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात महसूल दिनाचा मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील, तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या निवडक अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, वाहन चालक अशा विविध पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या निमित्ताने शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, महसूल संकलन, भू-संपादन, भू-अभिलेख व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, शासकीय जमिनींवरील अतिक्रमण हटवणे आणि वृक्षारोपण यांसारख्या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची माहिती जनतेसमोर मांडली जाईल.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय उपसंचालक (महसूल), उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्यासह सर्व संबंधित विभागप्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रत्येक कार्यालयाला आपला प्रतिनिधी अनिवार्यपणे उपस्थित ठेवण्याचे आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
महसूल सप्ताहादरम्यान दररोज विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यात महसूल न्यायालयांचे आयोजन, लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून योजनांची अंमलबजावणी, M-Sand धोरणाची अंमलबजावणी, छत्रपती शिवाजी महाराज महाराजत्व अभियान, वृक्षारोपण आणि अतिक्रमण हटवणे आदी उपक्रमांचा समावेश आहे. ‘महसूल दिन’ आणि ‘महसूल सप्ताह’ हे जनतेपर्यंत शासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरणार आहेत.