मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । १७ वर्षांपूर्वी मालेगावमध्ये घडलेल्या धक्कादायक बॉम्बस्फोट प्रकरणी अखेर मोठा निर्णय आला आहे. विशेष एनआयए न्यायालयाने भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्त करत निकाल जाहीर केला आहे. स्फोटानंतर अनेक वर्षे चाललेल्या तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया यानंतर या प्रकरणाचा पडदा अखेर खाली आला आहे.
२९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील भिखू चौकात रात्री ९.३५ वाजता झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते. त्या दिवशी रमजान आणि नवरात्रोत्सवामुळे परिसर गर्दीने फुलून गेला होता. स्फोटाने शहर हादरून गेले आणि त्यानंतर देशभरात राजकीय आणि सामाजिक खळबळ उडाली.
या प्रकरणात प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण सात जणांवर खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, एनआयएच्या विशेष न्यायालयाने तपासातील त्रुटी, अपुरे पुरावे आणि दोष सिद्ध न होऊ शकलेल्या मुद्द्यांच्या आधारे सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, सरकारी वकिलांनी स्फोट झाल्याचे सिद्ध केले असले तरी स्फोटासाठी वापरलेली मोटारसायकल प्रज्ञासिंह यांच्याशी संबंधित होती, हे सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले.
तसेच, न्यायालयाच्या निरीक्षणानुसार जखमींच्या वयानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. काही जणांचे वय १०१ वर्षे असल्याचा दावा केला गेला, तर काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड झाल्याचा संशय निर्माण झाला. यामुळे साक्षी-पुराव्यांवर न्यायालयाने विश्वास ठेवला नाही. तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याच्या ठिकाणचा कोणताही स्पष्ट पंचनामा, रेखाचित्र किंवा बोटांचे ठसे, डंप डेटा गोळा केला नव्हता, हे देखील न्यायालयाने अधोरेखित केले.
स्फोटात वापरलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट समजला गेला नव्हता. ती स्फोटाच्या आधी प्रज्ञासिंह यांच्या ताब्यात होती, हेही सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही. श्रीकांत पुरोहित यांच्या निवासस्थानी स्फोटके जमा केली गेली, याचा कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. नमुने खराब झाल्यामुळे काही अहवाल निर्णायक व विश्वासार्ह राहिले नाहीत, असंही नमूद करण्यात आलं.
या निकालासाठी १९ एप्रिल २०२५ रोजी तारीख राखून ठेवण्यात आली होती, आणि ८ मे रोजी निकाल जाहीर होणार होता. मात्र पुढे ती ३१ जुलैपर्यंत लांबवण्यात आली होती. अखेर आजचा दिवस या प्रकरणातील निर्णायक ठरला.
१७ वर्षांनंतर अखेर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल समोर आला असून, तपासातील त्रुटी आणि पुराव्यांच्या अभावामुळे सर्व आरोपींना निर्दोष घोषित करण्यात आलं आहे. या निकालामुळे एकीकडे काहींनी न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे मत व्यक्त केले आहे, तर दुसरीकडे यामुळे पुन्हा एकदा तपास यंत्रणांवरील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.