जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवार २८ मे रोजी दुपारच्या सुमारास कुसुंबा ते नेरीकडे जाणाऱ्या रोडवरील एका पुलाजवळ भाईदास सकस गायकवाड (वय-३३, रा. कुसुंबा, इंदिरा नगर) या तरुणाला अज्ञात हल्लेखोरांनी बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. लाथाबुक्क्यांसह दगडाने केलेल्या या मारहाणीमुळे भाईदास गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली असून, याप्रकरणी संशयित मुकेश कोळी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाईदास गायकवाड हे बुधवारी २८ मे रोजी दुपारच्या सुमारास कुसुंबाहून नेरीकडे जाणाऱ्या रोडवरील पुलाजवळ होते. त्याचवेळी संशयित मुकेश कोळी याने भाईदासला त्या ठिकाणी बोलावून घेतले. पुलाजवळ पोहोचल्यावर मुकेश कोळी आणि त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांनी भाईदास गायकवाड यांना रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही, तर हल्लेखोरांनी हातात दगड घेऊन भाईदासच्या दोन्ही पायांवर, कपाळावर आणि छातीवर प्रहार करत त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात भाईदास गायकवाड यांना जबर दुखापत झाली असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या गंभीर मारहाणीनंतर भाईदास गायकवाड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ दखल घेत संशयित मुकेश कोळी आणि त्याच्या अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकुंद पाटील करत आहेत.