जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात पाणीपुरवठा प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर झालेल्या एकूण १३७१ प्रकल्पांपैकी ४३४ प्रकल्प पूर्ण झाले असून, ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील अनेक गावे आणि वाड्यावस्त्यांवर आता स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा सुरू झाला आहे.
जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी या प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने होण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. त्यांनी स्थानिक पातळीवरील प्रशासन, अभियंते आणि ठेकेदार यांच्यासोबत नियमित बैठका घेऊन कामाला गती दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक पाणीटंचाईग्रस्त भागांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे, विशेषतः महिलांचे पाण्यासाठी होणारे कष्ट थांबले आहेत. त्यांना दररोज पाण्यासाठी दूरवर जाण्याची गरज राहिली नाही, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जल जीवन मिशन अंतर्गत उर्वरित प्रकल्पांचे कामही वेगाने सुरू आहे. लवकरच संपूर्ण जळगाव जिल्हा ‘हर घर जल’ या केंद्र सरकारच्या ध्येयाच्या दिशेने आगेकूच करेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. ‘जल जीवन मिशन’मुळे ग्रामीण महाराष्ट्रातील पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.