जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील लोहटार शिवारात भगवान कोष्टी यांच्या शेतातील विहिरीत आज सकाळी (३ जून) एका बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. रानडुकरांचा पाठलाग करत असताना बिबट्यासह काही रानडुकरेही विहिरीत पडल्याची ही थरारक घटना होती. विशेष म्हणजे, बिबट्याने विहिरीतच एका डुकराची शिकार केली. सुदैवाने विहिरीत पाणी कमी असल्याने बिबट्या सुखरूप होता.
माहिती मिळताच, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. वनविभागाच्या पथकाने बिबट्याला पिंजऱ्यात अडकवून सुरक्षितरित्या विहिरीबाहेर काढले. हा संपूर्ण थरारक बचावकार्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. बिबट्याला बाहेर काढल्यानंतर त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले आहेत. या बचावकार्यात अंतुर्ली गावातील नागरिकांनीही वनविभाग आणि पोलिसांना मोलाची मदत केली.