जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या संकल्पासह जळगाव तालुक्यातील खेडी शिवारात गट नंबर १६ मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करावे, या संदेशाला अनुसरून हा उपक्रम पार पडला.
महालक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दिनेश रवींद्र अत्तरदे यांनी या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी जळगावच्या तहसीलदार डॉ. शितल राजपूत, मंडळ अधिकारी राजेश भंगाळे, ग्राम महसूल अधिकारी रूपेश ठाकूर, महसूल सेवक राहुल सोनवणे आणि प्रशांत गवळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात खेडी शिवारातील प्रगतिशील शेतकरी दीपक पाटील आणि अविनाश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, सागर सरोदे, बंटी खडके, अमित चौधरी, मोहित वाणी, पंकज चौधरी आदींनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला. पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा वृक्षारोपण सोहळा पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरला.