रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील गारबर्डी गावाजवळील एका घाटामध्ये बुधवारी (४ जून) रात्री मजुरांच्या मालवाहू टेम्पोचा भीषण अपघात झाला. फैजपूर येथून मध्य प्रदेशात आपल्या गावी परतणाऱ्या मजुरांनी भरलेला भरधाव टेम्पो अनियंत्रित होऊन पलटी झाला. या अपघातात अनिल उर्फ अरविंद माका बारेला (वय १९, रा. मलगाव कोठा, जि. खरगोन, मध्य प्रदेश) या तरुणाचा जळगाव येथील उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, २२ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जळगावसह इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रावेर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलगाव कोठा येथील काही मजूर फैजपूर येथे मजुरीचे काम करण्यासाठी आले होते. काम संपल्यानंतर, बुधवारी रात्री ८ वाजता ते आपल्या गावी परतण्यासाठी मालवाहू टेम्पोने निघाले. रावेर तालुक्यातील गारबर्डी गावाजवळ असलेल्या घाटात चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो अचानक पलटी झाला. रात्रीच्या अंधारात काहीही कळण्याच्या आत हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना कळवले आणि मिळेल त्या वाहनाने जखमींना पाल येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल केले.
पाल येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमींवर प्रथमोपचार केले. त्यानंतर सात जणांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना अनिल बारेला याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. अनिलच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. तो मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. अनिलच्या मृत्यूमुळे रुग्णालयात त्याच्या वडिलांना शोक अनावर झाला होता. रावेर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अनिल बारेला याच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात प्राथमिक अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी जळगाव जिल्ह्यात अनेक अपघातांच्या घटना घडल्याने दिवसभर जिल्हा चर्चेत राहिला. अनिलच्या मृत्यूमुळे मलगाव कोठा गावावर शोककळा पसरली आहे.
जखमींची नावे:
चालक धरम नरोम सिसोदिया (२०), भुरीबाई नवा बारीला (१८), लाडकीबाई रीछू भिलाला (३०), नुस्तीबाई रिछू भिलाला (५५), सुमलीबाई प्रेमसिंग बारेला (५०), लक्ष्मी सोमसिंग बारेला (१६), शेवता वेसासिंग बारेला (२५), रूपा कालू बारेला (१६), दयाराम कालू बारेला (२०), पार्वती मधू बारेला (१२), सविता रामदास बारेला (१४), आशा मधू बारेला (१६), विकास वेचता बारेला (१५), हिरालाल गोरालाल बारीला (३०), सुभान कीछू बारेला (३२), सुरेश चेनसिंग भिलाला (१८), विजय अशोक बारेला (१५), सायली होवळसिंग बारेला (१५), रंजीता संजू बारेला (१४), भुरी गोडा बारेला (१८) आणि रघुवीर कालू बारेला (१८). हे सर्व कोठा, ता. जिरण्या, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत.