पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) आपला २० वा वर्धापन दिन ६ जून रोजी साजरा करत आहे. या निमित्ताने राज्यात ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ उत्साहात राबविण्यात येत आहे. पाचोरा शहरातही ५ जून रोजी सकाळी १० वाजता विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली.
गिरड रोडवरील कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने जमले. त्यांनी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून शहरातून मोटारसायकल रॅली काढली. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारक, ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्थानक रोड, व्ही.पी. रोड, रथ गल्ली, गांधी चौक, जामनेर रोड या मार्गांवरून काढण्यात आली. रॅलीचा समारोप छत्रपती संभाजी महाराज चौकात करण्यात आला.
यावेळी पाचोऱ्याचे कार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमाकांत पाटील, उपकार्यकारी अभियंता शामकांत खोडपे, आणि वीज वितरण कंपनी संघटना प्रतिनिधी दीपक आदिवाल, किशोर पाटील यांनी शहरातील मुख्य चौकात ग्राहकांना विजेच्या सुरक्षित वापराबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. यामध्ये विजेच्या खांबाजवळ पतंग न उडवणे, क्रिकेट किंवा इतर खेळ न खेळणे, विजेच्या खांबाच्या ताणास (स्टे वायर) जनावरे न बांधणे, बांधकाम करताना विजेच्या वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखणे, विजेच्या वाहिनीखाली गोठा/शेड न बांधणे (कारण ते धोकादायक ठरू शकते), धातूची शिडी/सळई/गज इत्यादींची वाहतूक करताना विजेच्या वाहिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घेणे यासारख्या सूचनांचा समावेश होता. या प्रसंगी पाचोरा येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम:
६ जून रोजी महावितरणच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुल, महाबळ रोड येथे दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कर्मचारी व त्यांच्या पाल्यांचे कलागुण सादरीकरण आणि सायंकाळी संगीत रजनीचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी परिमंडळ व मंडळ कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांचा लाभ सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.