धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना-उबाठा पक्षाच्या उपनेतेपदी पक्षाचे विद्यमान जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जळगाव जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश आले नाही. यामुळे जिल्ह्यात संघटनात्मक बदल होणार असल्याची चर्चा कधीपासूनच होत होती. यातच बऱ्याच ठिकाणी पक्षाला गळती लागल्याचे चित्र दिसून आले होते. खुद्द खासदार संजय राऊत यांनी जिल्ह्यात लक्ष टाकून याबाबतची माहिती जाणून घेतल्यानंतर मोठा बदल केला आहे.
दरम्यान, आज शिवसेना-उबाठा पक्षाने आज चार उपनेत्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यात जळगाव जिल्ह्यातून धरणगावचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव वाघ यांचा समावेश आहे. यासोबत त्यांच्यावर रावेर लोकसभा तसेच नंदुरबार लोकसभा संपर्क प्रमुख पदाची देखील जबाबदारी टाकण्यात आलेली आहे.
गुलाबराव वाघ हे शिवसेना-उबाठा पक्षाचे कट्टर निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या कठीण काळात देखील निष्ठा बाळगल्याचे फळ त्यांना उपनेतेपदाच्या माध्यमातून मिळाल्याचे मानले जात आहे.