यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, किनगाव-चुंचाळे रोडवरील इंदिरानगर परिसरातील एका दर्ग्याजवळ मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी १ किलो ७९ ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा ओला गांजा आणि ५ किलो २५४ ग्रॅम वजनाचा सुगंधी गांजा, असा एकूण सुमारे ६ किलो ३३ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे ६३ हजार रुपये आहे.
या कारवाईदरम्यान, एमएच-०१ बिबि १४०७ क्रमांकाची होंडा सिटी कार देखील जप्त करण्यात आली असून, तिची किंमत सुमारे तीन लाख रुपये आहे. अशा प्रकारे, पोलिसांनी एकूण ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक अस्लम खान, सहायक फौजदार विजय पाचपोळे, हेड कॉन्स्टेबल वासुदेव मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पवार, पोलीस नाईक अमित तडवी, पोलीस कॉन्स्टेबल मोहन तायडे, एजाज गवळी आणि सागर कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
रोनक रुबाब तडवी (रा. कुसुंबा, ता. रावेर) याच्याकडून हा गांजा आणि वाहन हस्तगत करण्यात आले आहे. रोनक तडवी हा आर्थिक फायद्यासाठी हा अमली पदार्थ चोरट्या मार्गाने विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी रोनक रुबाब तडवी याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.