जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी आज (बुधवार, ११ जून) शहराच्या पांझरापोळ गेटजवळ मुजोरी दाखवत एका गरीब हातगाडीवरील भाजीपाला विक्रेत्याला आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली त्यांची हातगाडी जप्त करून त्यावरील भाजीपाला रस्त्यावर फेकून कर्मचाऱ्यांनी प्रचंड नुकसान केल्याने नागरिक आणि विशेषतः विक्रेत्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
शालीग्राम पाटील हे आपल्या पत्नी वर्षा पाटील आणि मुलगा रोहित पाटील यांच्यासोबत कांचन नगरात राहतात. पांझरापोळ परिसरात हातगाडीवर भाजीपाला विकून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास शालीकग्राम पाटील आपल्या घराकडून पांझरापोळ येथे भाजीपाला विक्रीसाठी हातगाडी घेऊन जात होते. त्याचवेळी जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवून दमदाटी आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रस्त्यावरून जात असतानाच त्यांनी हातगाडीवरील सर्व भाजीपाला आणि इतर सामान रस्त्यावर फेकून दिले आणि हातगाडी जप्त केली.
बापलेकाला मारहाण, पोलीस ठाण्यात दखल नाही
या अमानुष कृत्याला शालीकग्राम पाटील आणि त्यांचा मुलगा रोहित पाटील यांनी विरोध केला असता, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोघा बापलेकांना कॉलर पकडून बेदम मारहाण केली. यात दोघांनाही हातापायाला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर संतप्त पाटील कुटुंबीयांनी तात्काळ शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे. अखेर, त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात याबाबत तक्रार दिली असून, चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. या घटनेमुळे महापालिका कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.