यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी मंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यावल तालुक्यातून मोठा पाठिंबा मिळत आहे. याच अनुषंगाने, १४ जून रोजी प्रहार संघटना यावल तहसील कार्यालयासमोर सकाळी १० वाजता आंदोलन करणार आहे. बच्चू कडू यांच्या विविध मागण्यांसाठीच्या उपोषणाला शासनाने अद्यापही दखल न घेतल्याने राज्यभर या आंदोलनाला बळकटी दिली जात आहे.
बच्चू कडूंच्या मागण्या आणि राज्यव्यापी पाठिंबा
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार, दिव्यांग, महिला आणि अन्य घटकांच्या न्याय व हक्कांसाठी ८ जूनपासून श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला महाराष्ट्रभरातून पाठिंबा मिळत असून, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्यभर या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत आहे. शासनाने अद्यापही त्यांच्या मागण्यांबाबत कुठलीही ठोस दखल घेतलेली नाही, ज्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढत आहे.
यावल तालुक्यातून दिव्यांगांचा सक्रिय सहभाग
यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या वतीने बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. आंदोलनाला अधिक बळकटी देण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १४ जून रोजी सकाळी १० वाजता यावल तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर आणि पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना देण्यात आले आहे.
प्रशासनाला इशारा : मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन
यावल तालुका अध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना हरी पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जर शासनाने या आंदोलनाकडे लक्ष न देता मागण्यांची दखल घेतली नाही, तर यापेक्षाही अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. यावेळी सुरेश मांगो पाटील, लक्ष्मण पाटील, किरण महाजन, संजय पाटील, उमेश पाटील, प्रतीक पाटील, गौरव महाजन यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.