भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मृग नक्षत्राला ८ जूनपासून प्रारंभ झाला असला तरी, पावसाने मात्र तिसऱ्या दिवशी, ११ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार वादळी वाऱ्यासह धुमाकूळ घालत हजेरी लावली. भडगाव तालुक्यातील गुढे परिसरातील शेतकरी मृगाच्या या पहिल्या पावसाने सुखावला असला तरी, वादळामुळे केळी व लिंबू बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
वादळाचा तडाखा: फळबागा जमीनदोस्त, वीजपुरवठा खंडित
गुढे परिसरातील आडळसे, जुवार्डी, पथराड, कोळगाव, पिंप्रीहाट, सावदे, दलवाडे, नावरे आदी गावांमध्ये अनेक शेतशिवारांतील केळी आणि लिंबू बागा मुळासकट उन्मळून, मोडून जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेतातील आणि रस्त्यावरील अनेक झाडे अर्ध्यावर मोडून पडली आहेत. तसेच, विजेचे खांब आणि तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे, ज्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांची प्रतीक्षा आणि वादळाचा अनपेक्षित फटका
मृगाच्या पहिल्या पावसाची शेतकरी तीन दिवसांपासून चातक पक्षासारखी वाट पाहत होते. अखेर पावसाने हजेरी लावली, पण या हजेरीसोबत आलेल्या वादळांच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी आणि लिंबू बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे पीक उद्धवस्त झाल्याने त्यांची निराशा वाढली आहे.
प्रशासनाकडे पंचनामा आणि नुकसान भरपाईची मागणी
या नुकसानीची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी आणि महसूल प्रशासनाने नुकसान झालेल्या गावातील शेतशिवारात तातडीने भेट देऊन, फळबागांबरोबरच इतर नुकसानीचाही पंचनामा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.