जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बी.जे. मार्केट परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी १३ जून रोजी सकाळी ८ वाजता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अयोध्या नगर येथील रहिवासी चैतन्य सुनील कोल्हे (वय ३५) यांचे नवीन बी.जे. मार्केट परिसरात ‘गायत्री कॉस्मेटिक’ नावाचे दुकान आहे. १२ जून रोजी रात्री ते दुकान बंद करून नेहमीप्रमाणे घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे भाऊ मंदार कोल्हे यांनी त्यांना फोन करून दुकानाच्या शटरचे कुलूप कोणीतरी तोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच चैतन्य कोल्हे तात्काळ दुकानावर पोहोचले.
त्यांनी दुकानाची पाहणी केली असता, दुकानाचे शटरचे कुलूप आणि कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. मात्र, त्यांनी दुकानात आत तपासणी केली असता, दुकानातील कोणतीही वस्तू चोरीला गेली नसल्याचे किंवा तिची जागा बदललेली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकारानंतर चैतन्य कोल्हे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलींद सोनवणे करत आहेत. पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.