जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील शेवाळे गावामध्ये घडलेल्या वृद्ध महिलेच्या निर्घृण खुनाचा छडा स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत लावला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
नेमके काय घडले?
गुरूवारी ५ जून रोजी रात्री ९ ते ११ वाजण्याच्या सुमारास शेवाळे गावातील ८५ वर्षीय जनाबाई महारू पाटील यांच्या राहत्या घरात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला. आरोपीने जनाबाईंच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले आणि त्यांचा खून केला. या घटनेनंतर मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची चक्रे वेगाने फिरली
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, दोन्ही पथकांनी शेवाळे गावामध्ये गोपनीय माहिती काढून तपास सुरू केला. तपासांती साहिल मुकद्दर तडवी (वय २१), राकेश बळीराम हातागडे (वय २१) आणि राजेश अनिल हातागडे (वय १८) या तिघांची नावे समोर आली. हे सर्व शेवाळे, ता. पाचोरा, जि. जळगाव येथील रहिवासी आहेत.
रागातून घडला खून, आरोपींची कबुली
अटक केलेल्या तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मयत जनाबाई पाटील यांच्या घरासमोर आरोपी नेहमी बसायचे आणि टिंगल-टवाळी करायचे. जनाबाई पाटील यांनी त्यांना असे करण्यापासून खडसावले होते. याच रागातून आरोपींनी जनाबाईंच्या घरात चोरी करून त्यांचा काटा काढायचा कट रचला. ठरल्याप्रमाणे, ५ जून रोजी रात्री आरोपींनी जनाबाई पाटील यांच्या घराच्या मागच्या दाराने आत प्रवेश केला. त्यांना मारहाण करून खून केला आणि त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने घेऊन अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक
जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा), सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे (पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन) यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, शरद बागल, विठ्ठल पवार, प्रकाश पाटील, अतुल वंजारी, लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, किशोर पाटील, भरत पाटील, महेश सोमवंशी, नरेंद्र नरवाडे, अभिजीत निकम, अमोल पाटील, इम्रान पठाण, मुकेश लोकरे, नामदेव इंगळे, मुकेश तडवी आणि सागर पाटील या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे करत आहेत.