खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खामगाव विधानसभा मतदारसंघात आजपासून (११ जून) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ‘पर्व’ सुरू झाले आहे. या मतदारसंघाचे सलग तीन टर्म काँग्रेसचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले आणि जवळपास ४० वर्षांपासून काँग्रेसमध्ये एकछत्री अंमल गाजवणारे माजी आ.दिलीप सानंदा यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे खामगावच्या राजकीय समीकरणात मोठे बदल अपेक्षित आहेत.
सानंदांसोबत ११ हजार सक्रिय सदस्यांचा प्रवेश: काँग्रेसला मोठा धक्का
माजी आमदार दिलीप सानंदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यासोबत खामगाव विधानसभा मतदारसंघातील तब्बल ११,००० पेक्षा जास्त सक्रिय सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये सहभागी झाले आहेत. “जब तक नाही काँग्रेस का परिणाम” असे वारंवार म्हणणारे दिलीप सानंदा अखेर आज जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाल्याने काँग्रेसला, विशेषतः बुलढाणा जिल्हा काँग्रेसला, मोठा धक्का बसला आहे. याच मतदारसंघात कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर (भाजप) हे येतात. आकाश फुंडकर आणि दिलीप सानंदा यांचे राजकीय नाते सर्वश्रुत असताना, आता हे दोघे महायुतीत सत्तेच्या केंद्रस्थानी आल्यानंतर मतदारसंघात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात आणि ते एकमेकांशी कसे जुळवून घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
९ मंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा: राष्ट्रवादीची जोरदार तयारी
हा प्रवेश सोहळा अत्यंत भव्यदिव्य करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. आकर्षक मंडप व्यवस्था, तसेच उपस्थित कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादीचे ‘लोगो’ असलेल्या छत्र्या आणि घड्याळे असे आगळेवेगळे उपक्रम दिसून आले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही दिलीप सानंदा यांना ७५ हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते, त्यामुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग इथे आहे हे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, दिलीप सानंदा यांचे सर्वपक्षीयांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत. अत्यंत आक्रमक शैलीने ते आपले राजकारण करतात, हे मतदारसंघातील नागरिकांनी पाहिले आहे. यामुळे याचा फायदा विदर्भात होतो का आणि त्यांना पक्षात एखादी मोठी जबाबदारी दिली जाते का, हे देखील येत्या काळात स्पष्ट होईल.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना होमपिचवरच हादरा
काँग्रेसने जेव्हापासून बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे, तेव्हापासूनच त्यांना त्यांच्या होमपिच असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातूनच मोठे हादरे बसायला लागले आहेत. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळती सुरू झाली आहे. यामध्ये जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या पाठोपाठ आता दिलीप सानंदा यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात डॅमेज कंट्रोल करण्याकरिता आणि स्वतःच्या होमपिचवरूनच हर्षवर्धन सपकाळ यांना मोठे आव्हान उभे राहणार आहे. लवकरच जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने काँग्रेसमोरील आव्हाने वाढणार आहेत.