जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या युवा व क्रीडा विभागाच्या माध्यमातून जळगाव शहरात विभागीय क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच मेहरूण शिवारात या भव्य क्रीडा संकुलाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना आणि खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
दर्जेदार प्रशिक्षण आणि विविध क्रीडा सुविधा
या क्रीडा संकुलात खेळाडूंना जिल्ह्याच्या ठिकाणीच दर्जेदार प्रशिक्षण मिळेल. यामध्ये ट्रॅक ॲन्ड फिल्ड, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, खो-खो, सॉफ्टबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, योगासने, जलतरण, शूटिंग, क्रिकेट, टेनिस, मार्शल आर्ट आणि जिम्नॅस्टिक यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र सुविधा असणार आहेत. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षित मार्गदर्शक, निवासी वसतिगृह, आहार, क्रीडा वैद्यक शास्त्र व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील.
क्रीडा केंद्र म्हणून जळगावला मान्यता
या विभागीय क्रीडा संकुलामुळे जळगाव जिल्ह्याला स्वतंत्र क्रीडा केंद्र म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हे संकुल केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासही पात्र असेल, ज्यामुळे जळगावची ओळख क्रीडा नकाशावर ठळकपणे उमटेल.
खेलो इंडिया आणि युवा विकास अभियानाशी संलग्न
या प्रकल्पाची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या ‘खेलो इंडिया’ आणि राज्य शासनाच्या ‘मिशन युवा’ अभियानाशी संलग्न आहे. खेळाडूंना स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यासाठी मजबूत पायाभूत क्रीडा सुविधा पुरवण्याचा यामागचा उद्देश आहे. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी आणि महापालिका प्रशासन याचे नियोजन करत आहेत.
ग्रामीण आणि आदिवासी खेळाडूंना व्यासपीठ
“खेळाडूंना संधी… जळगाव जिल्ह्याला क्रीडा मान्यता!” या घोषवाक्याला अनुसरून शासन क्रीडा क्षेत्रात भरीव गुंतवणूक करत आहे. या संकुलाच्या स्थापनेमुळे ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागातील खेळाडूंना पुढे येण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे लपलेल्या प्रतिभेला योग्य संधी मिळेल.