यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुका तलाठी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच यावल येथील जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत पार पडली. या बैठकीत संघटनेच्या नव्या कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी बामणोदचे मंडळ अधिकारी दीपक गवई यांची अध्यक्षपदी, तर डोंगरकठोरा येथील ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
ही सभा संघटनेचे माजी अध्यक्ष व फैजपूरचे मंडळ अधिकारी एम.एच. तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. तडवी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात संघटनेने महसूल कर्मचाऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवले होते. तसेच माजी उपाध्यक्ष भारत वानखेडे यांची इतरत्र बदली झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागांवरही निवड प्रक्रिया राबविण्यात आली.नवीन अध्यक्षपदी दीपक गवई यांची, तर उपाध्यक्षपदी गजानन पाटील यांची बिनविरोध निवड ही संघटनेतील एकमताचे आणि विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे. टाकरखेडा येथील ग्राम महसूल अधिकारी तेजस पाटील यांना पुन्हा सचिव म्हणून कायम ठेवण्यात आले असून, त्यांच्या कार्यशैलीबाबत संघटनेत समाधान व्यक्त करण्यात आले.
या निवड प्रक्रियेसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे प्रस्ताव हिंगोणा येथील ग्राम महसूल अधिकारी संदीप गोसावी यांनी मांडले. सर्व प्रस्तावक व उपस्थित सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा दर्शविल्यामुळे निवड प्रक्रिया अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. या नव्या कार्यकारणीमुळे यावल तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि मागण्या अधिक प्रभावीपणे मांडल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे संघटनेच्या कामकाजात नवे वळण येण्याची शक्यता असून, महसूल विभागातील विविध स्तरातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले जात आहे.