भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील आगाखान वाडा परिसरात जुन्या वादातून एका महिलेसह तिच्या भाच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी ११ जून रोजी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी गुरुवारी (१२ जून) मध्यरात्री अडीच वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
याबाबत अधिक माहिती अशी की, आगाखान वाडा परिसरात सुलताना अहमद कुरेशी (वय ४३) आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गुलाम, गुलामदस्तगीर आणि आवेश (तिघांचे पूर्ण नाव अज्ञात, सर्व रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) या तिघांनी सुलताना कुरेशी यांना घराबाहेर ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. हे भांडण सोडवण्यासाठी सुलताना यांचा भाचा साहिल शेख मुशीर पुढे आला असता, या तिघांनी सुलताना कुरेशी आणि साहिल दोघांवरही चाकूने वार करून गंभीर दुखापत केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात घबराट पसरली.
बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरु
या घटनेनंतर तातडीने जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर, गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुलाम, गुलामदस्तगीर आणि आवेश या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करत आहेत. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे भुसावळ शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.