फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | हॉटेलमधील बिलाच्या वादातून सुरू झालेल्या भांडणाचे पर्यवसान जातिवाचक शिवीगाळ व त्यानंतरच्या हिंसक हल्ल्यात झाले. हॉटेल व्यवस्थापक व त्याच्या दोन मित्रांना गावठी कट्ट्यासह रोखून बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही थरारक घटना फैजपूर शहरातील सुभाष चौकात मंगळवारी (दि. १०) रात्री साडेअकरा वाजता घडली.
याप्रकरणी फैजपूर पोलिसात शेख आरिफ शेख कलीम, शाहरुख शेख, आसिफ शेख व आकिब शेख या चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
घटनेचा तपशील असा की, यावल रोडवरील हॉटेल तृभावी येथे दुपारी बिलावरून वाद झाला होता. यावेळी हॉटेल व्यवस्थापक सुमित ऊर्फ छोटू मार्तंड साळुंके (रा. फैजपूर) याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. याचा जाब साळुंके यांनी फोनवरून विचारल्यावर वाद अधिक चिघळला.
राग मनात धरून रात्री सुभाष चौकात सुमित साळुंके व त्याचे मित्र अमोल तायडे आणि सागर भालेराव यांच्यावर आरोपींनी लोखंडी रॉड, चाकू व गावठी कट्ट्याचा वापर करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सुमित साळुंके यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी शेख आरिफ, शाहरुख शेख व आसिफ शेख यांना अटक करण्यात आली असून आकिब शेख फरार आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, स. पो.नि. रामेश्वर मोताळे, पीएसआय नीरज बोकील व विनोद गभाने करत आहेत.