यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात गेल्या आठ दिवसांपासून विस्कळीत झालेला पाणीपुरवठा, आठवडे बाजारातील वाढते अतिक्रमण आणि महिलांसाठी सुविधा नसल्याच्या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने यावल नगर परिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांना निवेदन देत सर्व मागण्यांचे तातडीने निवारण करण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शहरातील नागरिक गेल्या आठवड्यापासून पाण्याच्या टंचाईने हैराण झाले असून, नगर परिषदेच्या माध्यमातून होणारा नियमित पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याप्रश्नी निवेदनात सांगण्यात आले की, पाणीपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराच्या कामगारांना महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने त्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे कंत्राटदाराकडे असलेली देयके तातडीने अदा करावीत आणि शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा.
यावल शहरातील आठवडे बाजार अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर भरवला जातो. या ठिकाणी अवजड वाहनांची सतत ये-जा होत असल्याने भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी हा बाजार नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या जागेवर भरवला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांत आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्यामुळे ती जागा व्यापारी व नागरिकांसाठी अपुरी पडत आहे. या अतिक्रमणांविरोधात न्यायालयाने निकाल दिला असतानाही नगर प्रशासनाने आजतागायत कोणतीही कार्यवाही केली नसल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे. हे अतिक्रमण त्वरित काढल्यास बाजार पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी भरवणे शक्य होईल.शहरात महिलांसाठी प्रसाधनगृह व सार्वजनिक शौचालयांचा अभाव असून, आठवडे बाजारात येणाऱ्या महिलांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मनसेने या सुविधाही तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
या सर्व मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी गवई यांना सविस्तर निवेदन दिले. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष गौरव कोळी, तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे, उपतालुकाध्यक्ष शाम पवार, जनहित विधी विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर व नागरिक उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या संख्येने नागरिक व महिलांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी स्पष्ट चेतावणीही मनसेने दिली आहे. त्यामुळे यावलच्या नागरी प्रश्नांवर प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.