जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी महाविकास आघाडीने आज जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस काळे फासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत, आघाडीच्या नेत्यांनी सरकारचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत…
महायुती सरकारवर आश्वासनांच्या पूर्ततेचा दबाव
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना स्पष्ट आश्वासन दिले होते की, “आम्हाला मतदान करा, आम्ही तुमच्या शेतीचे कर्ज माफ करू.” मात्र, आता कर्जमाफीची वेळ आल्यावर सरकार आपला शब्द फिरवत आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांप्रती आदर न दाखवल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले नसून, केवळ मतांसाठी आश्वासने दिल्याचे महाविकास आघाडीचे म्हणणे आहे.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकवटले
या निषेध आंदोलनात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी लावून धरली. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला. या आंदोलनामुळे कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महाविकास आघाडीच्या आंदोलनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी जळगाव येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या आंदोलनात विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी सहभाग घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर अध्यक्ष मंगलाताई पाटील आणि महिला युवक अध्यक्ष सौ. कल्पिताताई पाटील उपस्थित होत्या. तसेच, शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश पाटील देखील आंदोलनात सहभागी झाले होते.
काँग्रेस आणि इतर घटक पक्षांचा सहभाग
काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोजभाऊ चौधरी यांच्यासह छगन खडसे, आबा कोळी, प्रभाकर कोळी, विशाल सोनावणे, कुंदन कोळी, प्रमोद घुगे, सचिन चौधरी, भाऊराव इंगळे, किरण राजपूत, गौरव वाणी, मतीन सैय्यद, रहीम तडवी, राजू पाटील, एके खाटिक, राजू मोरे, सुनील माळी, फरहान शेख, विशाल देशमुख आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी सरकारचा निषेध केला.