जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील दीपक जगदेव पाटील (वय-३४) यांचा मृतदेह नशिराबादजवळ एका विहिरीत तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना समोर आल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि त्याची ओळख पटवली.
नशिराबाद शिवारात एका विहिरीमध्ये एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो गाडेगाव येथील दीपक जगदेव पाटील यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी आणि शवविच्छेदनासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.