जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगरात गुणगौरव समारंभ, वह्या वाटप आणि शिवसेना सदस्य नोंदणी कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थित नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. श्री गणेश क्रीडा सामाजिक व शैक्षणिक संस्था, गुरुमाऊली महिला बचत गट आणि नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या भाषणात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे सल्ले दिले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयासाठी सातत्याने अभ्यास करावा, मोबाईलपासून अंतर ठेवावे आणि जिद्द, कष्ट व संयम यांची कास धरावी. प्रत्येक यश हे मेहनतीचे फळ आहे, त्यामुळे परिश्रमाशिवाय पर्याय नाही.”
शिवसेनेच्या वाटचालीसंदर्भात बोलताना पालकमंत्री पाटील यांनी, “बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वाला अनुसरून शिवसेना कार्यरत आहे. शिवसेनेची सदस्य नोंदणी ही केवळ पक्षाची वाढ नसून, सामान्य जनतेच्या हितासाठी झटण्याची आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची एक शपथ आहे,” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या १५ गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये दहावीचे सत्यम पुरोहित, जान्हवी वाणी, पूर्वा खोले, अक्षरा जैस्वाल, कुणाल देशमुख, गायत्री सोनार, हुड्डा खाटीक, मोहित बारेकर, सायली सोनार, तर बारावीचे चेतन कुमावत, प्रांजली पाटील, सोहन वागले, दर्शन पाटील यांचा समावेश होता. या सर्व विद्यार्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या गुणगौरवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह संचारला. याशिवाय, कार्यक्रमात उपस्थित ५०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांना शैक्षणिक मदत मिळाली.
यावेळी आयोजित शिवसेना (शिंदे गट) सदस्य नोंदणी अभियानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ५६० नागरिकांनी शिवसेना सदस्य म्हणून नोंदणी केली, अशी माहिती ॲड. दिलीप पोकळे यांनी दिली.
या प्रेरणादायी कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, महिला जिल्हाध्यक्ष सरिताताई कोल्हे, महानगर प्रमुख संतोष पाटील, शहरप्रमुख कुंदन काळे, किशोर बाविस्कर, गणेश सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख श्याम कोगटा, ॲड. दिलीप पोकळे, चेतन संकत, स्वप्निल परदेशी, हर्षल मावळे, ज्योतीताई शिवदे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू महांगडे यांनी केले, तर प्रास्ताविक अतुल हराळ यांनी केले. आभारप्रदर्शन माजी नगरसेवक व कार्यक्रमाचे संयोजक नवनाथ दारकुंडे यांनी मानले.