जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज, शुक्रवार, १३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसह अनेक मागण्या
शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, ही प्रमुख मागणी होती. याव्यतिरिक्त, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे, अशी मागणीही करण्यात आली.
महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करत सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही शिवसेनेने केली. तसेच, शासनाने शेतकी संघांना ज्वारी खरेदीचे दिलेले ३,००० क्विंटलचे उद्दिष्ट वाढवून ते १०,००० क्विंटलपर्यंत करावे, अशी मागणीही निवेदनात नमूद आहे.
थकीत योजनांचा लाभ आणि हमीभावाची मागणी
शेतकऱ्यांशी संबंधित इतर मागण्यांमध्ये, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या आठ महिन्यांपासून थकीत असलेले लाभ त्वरित देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा, हा मुद्दाही शिवसेनेने लावून धरला.
या शिष्टमंडळात शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात माजी आमदार दिलीप भोळे, जिल्हा संघटक करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, तालुका प्रमुख उमेश पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, महानगर समन्वयक संतोष पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, अल्पसंख्यांक आघाडी महानगरप्रमुख जाकिर पठाण, उपमहा नगरप्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, कुसुंबा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, विभाग प्रमुख किरण भावसार, विजय बांदल, शोएब खाटीक, कलीम खान, शरीफ रंगरेज, सचिन चौधरी, विजय राठोड आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.