जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून तीन अल्पवयीन मुलांनी दानपेटी लांबविली. गुन्हा दाखल होताच रामानंद नगर पोलिसांनी शोध घेत तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ हजार रुपयांची रोकड व दानपेटी हस्तगत गेली. ही घटना ५ ते ६ जून दरम्यान गणपतीनगरात घडली. याबाबत शुक्रवार ६ जून रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, गणपती नगर परिसरात असलेले गणपती मंदिर गुरुवारी ५ जून रोजी रात्री पुजाऱ्याने बंद केले. त्यानंतर चोरट्यांनीन मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून दानपेटी लांबविली. सकाळी पुजारी आले त्या वेळी दानपेटी गायब होती. याविषयी त्यांनी नागरिकांना माहिती दिली. सर्वांनी दानपेटीचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. या प्रकरणी विलास रमेश सांगेरे (५२, रा. आदर्श नगर) यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर ही चोरी तीन अल्पवयीन मुलांनी केल्याची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपासाधिकारी पोहेकॉ सुशील चौधरी यांनी गुप्त माहितीच्या आधारे तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यांच्याकडून १४ हजार रुपयांची रोकड व पाच हजार रुपये किमतीची दानपेटी हस्तगत केली. तीनही अल्पवयीन मुलांना समज देऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.