फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथील कौमी एकता फाउंडेशनच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेत पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेदरम्यान सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
संस्थेने राज्यात लागू असलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची माहिती दिली. तसेच, या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी परिसरात लवकरच मोहीम सुरू करण्याची घोषणा केली. यंदाच्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर, शासनाने कुर्बानीसाठी परवानगी दिलेल्या जनावरांचीच कुर्बानी द्यावी, असे सभेत सर्वानुमते ठरले. शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करूनच कुर्बानी करावी, असे आवाहनही संस्थेने केले. याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि पत्रके छापून जनजागृती करण्यात येणार आहे.
कौमी एकता फाउंडेशनच्या या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शेख कुर्बान, उपाध्यक्ष शेख इरफान, सय्यद असगर, सचिव सय्यद जावेद, आसिफ दादा मोहम्मद, जफर खान, कलीम खा, ॲड. शेख खालिद, जाबिर खान, शेख रफिक, शेख आसिफ, शेख आरिफ, शेख इद्रीस, हमीद शेख, शेख अकील यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.