मुंबई – मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ 9 जून रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेल्याने प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर पडल्याची घटना घडली. या घटनेत आतापर्यंत 6 प्रवाशांचा मृ्त्यू झाला आहे. तर दोन प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी सगळी घटना सांगितली- लोकलमधून प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. एका ट्रॅकवरुन सीएसएमटीकडे लोकल जात होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने लोकल जात होती. यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेल्याने सकाळी 9.30 वाजता ही दुर्घटना घडली आणि 9.50 पर्यंत ॲम्युबलन्सने प्रवाशांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मुंब्रा आणि दिवा दरम्यान ही घटना घडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली- दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले? सदर घटना अत्यंत दुर्देवी आहे. प्रशासनाने या अपघातामागील कारण शोधलं पाहिजे, असं शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.